उस्मानाबाद -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून दोन दिवस उस्मानाबाद जिल्हा लॉक डाऊन करण्यात येणार आहे. 21 आणि 22 मार्चपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.
उस्मानाबाद दोन दिवसांसाठी लॉक डाऊन कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर दीपा मुधोळ-मुंडे यांनी हा निर्णय घेतला.
हेही वाचा -कोरोना विशेष: भारत तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर.. अंनिस कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांची माहिती
आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि देशभरात कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव झपाट्याने होत आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा दोन दिवसांसाठी लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या दोन दिवसांच्या बंदमधून शासकीय-निमशासकीय कार्यालये, पाणी पुरवठा व सांडपाणी निचरा व्यवस्थापन, सर्व बँका, दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुरवठा करणारे, रस्ते वाहतूक आणि रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला, किराणा पुरवणारी दुकाने, दवाखाने आणि औषधे दुकाने, विद्युत पुरवठा, ऊर्जा संसाधने, प्रसार माध्यमे या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या विभागांना वगळण्यात आले आहे. इतर दुकाने बंद ठेवावेत, असे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.