उस्मानाबाद- कोरोना विषाणूमुळे आंदोलने आणि मोर्चे बंद आहेत. मात्र,आज पालकमंत्री शंकरराव गडाख यांचा ताफा चक्क मोकाट जनावरांनी अडवला. पालकमंत्र्यांचा ताफा मोकाट जनावरांनी अडवल्याने त्यांनी आंदोलन सुरू केले की काय? अशा चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाल्या.
पालकमंत्र्यांचा ताफा मोकाट जनावरांनी अडवला... उस्मानाबादकरांना मोकाट जनावरांचा त्रास नेहमीचाच आहे. शहरातील मुख्य रोडवर ज्ञानेश्वर मंदिर ते देशपांडे स्टॅन्ड या दरम्यान वारंवार मोकाट जनावरे रस्त्याने फिरताना दिसतात. याचा नाहक त्रास सामान्य वाटसरू आणि वाहनधारकांना सहन करावा लागतो. मात्र, आज मोकाट जनावरांचा फटका चक्क पालकमंत्री शंकरराव गडाख यांना बसला आहे.
पालकमंत्री शंकरराव गडाख हे आज कोरोना प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उस्मानाबाद मध्ये आले होते. उस्मानाबाद येथे आल्यानंतर गडाख यांनी कोविड प्रयोग शाळेला भेट दिली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाला भेट देण्यासाठी जात असताना जिल्हा कारागृहासमोर 20 ते 25 जनावरांचा कळप पालकमंत्री गडाख यांच्या गाड्यांच्या ताफ्यासमोर समोर उभा ठाकला होता. त्यामुळे पालकमंत्र्यांना आणि त्यांच्या ताफ्याला काही क्षण रस्त्यातच थांबावे लागले.
शंकरराव गडाख यांच्यासोबत जिल्हाधिकारी दिपा मूधोळ-मुंडे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांच्या 14 गाड्या येत होत्या. मोकाट जणावरांच्या कळपामुळे सर्वांना थांबत थांबत पुढे जावे लागले. त्यामुळे या जनावरांच्या कळपानेच आंदोलन सुरू केले काय? असा प्रश्न नागरिकांना पडला होता.