उस्मानाबाद - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. गेल्या सात दिवसांपासून तुळजाभवानी निद्रावस्थेत होती. त्यामुळे आज तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली आहे.
नवरात्र महोत्सवानिमित्त आज दुपारी विधीवत पूजा करून देवीच्या गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली. या घटामध्ये गहू, ज्वारी, करडई, जवस, हरभरा अशी वेगवेगळ्या प्रकारची पाच धान्य असतात. हे धान्य काळ्या मातीत पेरले जाते. यावरती गोमूत्र टाकले जाते. त्यानंतर या घटाला पाणी घातले जाते व घटाच्या मधोमध खाऊच्या पानांची माळ करून सोडली जाते. अशा पद्धतीने घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला सुरुवात केली जाते.