उस्मानाबाद - गांधींच्या पेहरावात प्रचार करण्यासाठी ओळखले जाणारे मनोहर पाटील हे वाराणसीमधून निवडणूक लढणार आहेत. याआधी त्यांनी उस्मानाबादमधून अर्ज दाखल केला होता. पण, छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद झाला होता. त्यामुळे त्यांनी आता वारणसीतून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनोहर पाटील १९९९ पासून वेगवेगळ्या निवडणुका लढवत आहेत. त्यांना एकदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक देखील लढवली आहे.
मनोहर आनंद पाटील हे औसा तालुक्यातील मंगरुळ गावाचे रहिवासी आहेत. भारतीय सीमेवरती आर्मड फोर्सेसमध्ये रायफल विभागात ते कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते गावात परतले. १९९३ च्या भूकंपात त्यांनी सर्व कुटूंब गमावले. या भूकंपात त्यांचे आई, वडील, भाऊ, बायको, मुले या सर्वांचा मृत्यू झाला. तेव्हापासून पाटील एकाकी जीवन जगतात. पेन्शचे पैसे ते झाडे लावण्यासाठी आणि प्रदुषणमुक्तीचा संदेश देण्यासाठी खर्च करतात असे ते सांगतात.