उस्मानाबाद -उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजाभवानी मंदिर संस्थान व तुळजाभवानी देवीच्या नावाने बोगस वेबसाईट काढून भाविकांची फसवणूक करणाऱ्या एका वेबसाईटचे नाव पुढे आले होते. पण, आता नवीन माहिती समोर आली असून इतर आणखीन 4 वेबसाईटच्या माध्यमातून देखील भाविकांची फसवणूक केली असल्याचे तक्रार मंदिर संस्थानकडून देण्यात आलेली आहे. याबाबत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट वेबसाईटवरून भाविकांची फसवणूक होत असल्याची माहिती, एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने उघडकीस आणली आहे. या प्रकरणामुळे उस्मानाबाद जिल्हा प्रशासन हादरले आहे.
भाविकांची ऑनलाइन फसवणूक
विविध पूजा करण्याच्या नावाने आर्थिक फसवणूक करणाऱ्या इतर चार अज्ञात वेबसाईटच्या चालकांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिराला देशातील भाविक दर्शनासाठी येतात. ज्यांना येणे शक्य नाही असे भाविक ऑनलाइन रक्कम पूजा आणि प्रसादासाठी देतात. पण, भाविकांची फसवणूक करण्यासाठी बनावट वेबसाईट तयार करून रकमा घेतल्या आहेत. प्रकरण गंभीर असल्याने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानुसार मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक अनिल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
माहिती अधिकारातून बनावट वेबसाईटचा पर्दाफाश