उस्मानाबाद - जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. सहजपणे उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे दारू पिणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. याचा सर्वात जास्त त्रास महिलांना सहन करावा लागतो. या दारू प्रकरणावर वडगाव सिद्धेश्वर येथील महिलांचा रुद्रावतार पहायला मिळाला. गावातील महिलांनी दारूविक्री सुरू असलेल्या दुकानांची तोडफोड केली.
महिलांनी पुढाकार घेऊन सरपंचाला दारू विक्री बंद करण्याचे निवेदन दिले. त्यानंतर दारू विक्री करणाऱ्या व्यक्तिची भेट घेऊन त्याला दारूविक्री बंद करण्याची विनंती केली. मात्र, त्याने महिलांना अरेरावीची भाषा वापरली. या प्रकारामुळे चिडलेल्या महिलांनी दारूविक्री दुकानाची तोडफोड केली. विक्रेत्याने लपवून ठेवलेली दारूही शोधून नष्ट केली.