उस्मानाबाद -गेल्या काही दिवसांपूर्वी दुबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्यास कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. याच कुटुंबात कामासाठी असलेल्या कळंब तालुक्यातील सहा जणांच्या कुटुंबाने भीतीपोटी पुणे येथून गुपचूप धूम ठोकली होती. या कुटुंबाला शोधताना प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली आहे. हे कुटुंब अद्याप बेपत्ता आहे.
दरम्यान, या कुटुंबाचा शोध घेत असताना उस्मानाबाद-लातूर जिल्ह्याच्या सीमेवर त्यांच्यासारखीच नावे असलेले आणखी एक कुटुंब सापडले. त्यातील सर्वांना तपासणीसाठी ताब्यात घेतले. मात्र, हे कुटुंब पुण्यातून धूम ठोकलेले कुटुंब नसून दुसरेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीही हे कुटुंबही पुण्यातूनच आलेले असल्याने त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे.
दुबईहून पुण्यात आलेल्या एका दाम्पत्यास कोरोनाची लागण झाल्याचे आठ दिवसानंतर निष्पन्न झाले. त्या कुटुंबात कळंब तालुक्यातील एक कुटुंब कामाला होते. मालकाला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच या कुटुंबातील सर्वांनी आपल्यालाही संसर्ग होईल, या भीतीने गुपचूप धूम ठोकली.