उस्मानाबाद - जलयुक्त शिवार योजनेची चौकशी लावून विरोधी पक्षनेत्याचे तोंड बंद करता येईल, असे सरकारला वाटत असेल तर ते चूकीचे आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला ठणकावले आहे. आम्ही जलयुक्त शिवारमुळे शेतकऱ्यांना कसा फायदा झाला हे दाखवून देऊ, असेही ते म्हणाले. उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवारची चौकशी राज्य सरकारने नक्की करावी. ही कामे आम्ही मंत्रालयात बसून सह्या करून टेंडर ने दिलेली नव्हती. ६ लाख कामे पूर्ण झाली ती विकेंद्रीत होती. ती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. अनेक विभागाकडून ही कामे झाली. स्थानिक पातळीवर ही कामे केली गेली.
मला ६ लाख कामात ७०० तक्रार आल्याचे सांगितले होते. हे प्रमाण अतिशय अल्प आहे. असे असताना चौकशी लावून तोंड बंद करता येईल असे सरकारला वाटत असेल तर ते चुकीचे आहेत. वेळ पडली तर जलयुक्त शिवारचा फायदा कसा झाला हे दाखवून देऊ. यासाठी आम्ही शेतकऱ्यांना त्यांना कसा फायदा झाला हे त्यांच्या तोंडून संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देऊ, असे फडणवीस यांनी सांगितले.