उस्मानाबाद -कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानानंतर आज अखेर कोविड लसीकरणास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील मुख्य शासकीय रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात झाली. आज पहिल्याच दिवशी 300 जणांचे लसीकरण करण्यात येणार असून, लसीकरणासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात तीन केंद्रांवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारीच या लसी केंद्रांवर पाठवण्यात आल्या होत्या. आज प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यातील 9100 जणांची नोंदणी केली असून, यातील 8 हजार 272 जण आरोग्य सेवेतील आहेत. एका केंद्रावर एका दिवशी 100 जणांनाच ही लस देण्यात येणार असून, यानुसार पहिल्या दिवशी 300 जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे.