उस्मानाबाद - भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आज(मंगळवार) जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन केले. 'उद्धवा अजब तुझे सरकार' या गाण्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. विविध मागण्यांच्या व्यथा भाजपने यावेळी मांडल्या.
'उद्धवा अजब तुझे सरकार' या गाण्याच्या माध्यमातून भाजपचे राज्य सरकारविरोधात आंदोलन - महाविकास आघाडी सरकार
भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात आज(मंगळवार) जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन केले.
या सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण होत आले आहेत. मात्र, आतापर्यंत या आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले नाहीत. शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. महिलांवर होणारे अत्याचार हे सरकार रोखू शकले नाही, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करतो असे आश्वासन दिले होते, त्याचबरोबर दुष्काळी मदत, गारपीटी मदत देऊ अशी घोषणा या सरकारने केली होती. मात्र, कोणतेच आश्वासन पूर्ण केले नसल्याने हे आंदोलन करत असल्याचे भाजपने सांगितले आहे. यावेळी हातात फलक घेऊन महाविकास आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनावेळी शेतकऱ्यांना बोलावून प्रतिकात्मक कोरा सातबारा देण्यात आला.
हेही वाचा -नगरमध्ये कर्जमुक्ती योजनेच्या प्रक्रियेला सुरुवात, २ लाख ५८ हजार शेतकर्यांना मिळणार लाभ