उस्मानाबाद- जिल्ह्यातील कसबे तडवळे येथील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी ढवळे यांनी एक चिठ्ठी लिहिली. त्यात माझ्या आत्महत्येस ओमप्रकाश राजेनिंबाळकर व विजय दंडणाईक हे जबाबदार असून यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे.
दहा दिवसानंतर 'त्या' शेतकऱ्याचा अस्थीकलश उद्धव ठाकरेंना पाठवणार
उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचार सभेसाठी आल्यानंतर या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेटही घेतली नाही. त्यामुळे योग्य तो न्याय मिळावा यासाठी अस्थींचे विसर्जन न करता या अस्थी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहेत.
ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक यांनी संगणमत करून दिलीप ढवळे यांच्यासह इतर ७२ शेतकऱ्यांच्या जमिनीवरती तेरणा सहकारी साखर कारखान्यासाठी कर्ज काढले होते आणि ही कर्जाची रक्कम फेडण्याची हमी दिली होती. मात्र, बँकेने कर्ज फेडण्यास टाळाटाळ केली आणि त्यामुळे ढवळे यांच्या जमिनीचा तीन वेळा लिलाव करण्यात आला. त्यामुळे झालेल्या मानहाणीत दिलीप ढवळे निराश झाले होते. बदनामी झाल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्री घाटली. मात्र, तेथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे निराश झालेल्या ढवळे यांनी १२ एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ढवळे यांनी लिहिलेल्या चिट्ठीमध्ये स्पष्टपणे ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि विजय दंडनाईक यांचे नाव असूनही अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचार सभेसाठी आल्यानंतर या आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेटही घेतली नाही. त्यामुळे योग्य तो न्याय मिळावा व दिलीप ढवळे यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी या अस्थींचे विसर्जन न करता या अस्थी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहेत, असे ढवळे यांच्या कुटुंबाने सांगितले आहे.