महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Osmanabad Supari Killer Arrested : संपत्तीच्या वादातून जीवे मारण्यास सांगितले, सुपारी किलरला पोलिसांनी पिस्तुलासह पकडले

संपत्तीच्या वादातून उस्मानाबाद येथील एक जणाची सुपारी दिल्याचा ( Asked To Kill In Property Dispute ) धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कट रचणाऱ्यासह सुपारी किलरच्या मुसक्या कळंब पोलिसांनी आवळल्या ( Osmanabad Supari Killer Arrested ) असून, सहा दिवसात या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. नाकाबंदी दरम्यान एका संशयित तरुणाला कळंब पोलिसांनी पिस्तूलासह ताब्यात घेतले होते. त्याची कसून चौकशी केली असता, या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

Supari Killer Arrested
सुपारी किलरला पोलिसांनी पिस्तुलासह पकडले

By

Published : Dec 16, 2021, 12:11 PM IST

उस्मानाबाद : पैशाच्या हव्यासापोटी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो याचा प्रत्यय उस्मानाबादेत आला आहे. प्रॉपर्टीसाठी थेट सुपारी किलरला जीवे मारण्याची सुपारी ( Asked To Kill In Property Dispute ) दिल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी अरुण रणजितसिंह जमादार या आरोपीला पोलिसांनी पिस्तुलासह जेरबंद केले ( Osmanabad Supari Killer Arrested ) आहे.

६ डिसेंबर रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश, पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, पोलीस अंमलदार विक्रम पतंगे, मिनाज शेख, साद्दीक मोहम्मद सय्यद, वाहन चालक पोलीस अंमलदार काटवटे रात्री १ च्या सुमारास पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एक व्यक्ती काळ्या रंगाच्या हिरो होंडा मोटरसायकलवर ढोकीवरुन कळंबकडे येत असून त्याच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या व्यक्तीला सापळा लावून पकडण्यात आले. त्याच्याकडून एक पिस्टल मॅग्झीनसह ४ जिवंत काडतूस तसेच मोबाईल व विना क्रमाकांची मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या मोबाईलच्या आधारे घेतली माहिती
पोलीस ठाणे कळंब ( Kalamb Police Station ) येथील पोलीस कर्मचारी विक्रम मेघराज पतंगे यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे यांच्याकडे देण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला खाक्या दाखवल्या असता, आरोपीने अरुण रणजितसिंह जमादार असे नाव सांगितले. मिळालेल्या मोबाईलच्या आधारे तंत्रज्ञानाचा वापर करून खबऱ्यांची सूत्रं फिरवली असता ऍड. उपासना विजयसिंह परिहार (वय ४२ वर्ष) व अबरारोद्दीन निजामोद्दीन शेख (वय ४०, दोघे राहणार सदर बझार, अंबाजोगाई) यांच्यासोबत मिळून कट रचल्याचे निष्पन्न झाले.

इतर आरोपींना रोख रकमेसह अटक
सहाय्यक अधीक्षक एम. रमेश व टिमने ९ डिसेंबर रोजी अंबाजोगाई येथे सकाळी ८ वाजेच्या सुमारास दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या घराची झडती घेवून १ लाख ३० हजार रूपये रोख, एक एअर पिस्टल, काळ्या रंगाची दोन पिस्टल पाऊच, आरोपीचे मोबाईल तसेच अॅड उपासना परिहार यांची गुन्ह्यात वापरलेली एक टीव्हीएस कंपनीची स्कुटी असा मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता सुपारी किलिंगचा प्रकार समोर आला.

संपत्तीच्या वादातून सुपारी दिल्याचं चौकशीत उघड
अॅड उपासना विजयसिंह परिहार यांनी इतर आरोपीसह कट करून मुख्य आरोपीची उस्मानाबाद येथील बहिण अर्चना रणजित राजपूत व नितीन रणधीर देशमुख यांच्यात असलेल्या प्रॉपर्टीच्या वादामुळे देशमुख यांना जिवे मारण्याचा कट रचला. तसेच पिस्टल व जिवंत काडतूस पूरवून दीड लाख देण्याच्या बोलीवर सुपारी दिली होती.

जीवे मारण्याचा पहिला प्रयत्न फसला
विशेष म्हणजे उस्मानाबाद शहरातील सांजा परिसरात नितीन रणधीर देशमुख यांच्या येथे जाऊन आरोपींनी पहाणी केली होती. याची माहिती सुपारी किलरला देण्यात आली होती. देशमुख यांना जीवे मारण्याचा एक प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न फसला होता. सुपारी किलरकडील पैसे संपल्यामुळे तो कळंब मार्गाने अंबाजोगाई येथे पैसे आणण्यासाठी जात असताना त्याला पोलिसांनी अटक केली होती.

पिस्तूल विकणारी टोळी कोणती?
कळंबमध्ये अरुण रणजितसिंह जमादार याला पोलिसांनी अटक केल्यानंतर सहा दिवसात सुपारी किलिंगचा धक्कादायक प्रकार उघड केला आहे. सुपारी किलरला देण्यात आलेली पिस्तूल ही कोठून खरेदी करण्यात आली होती? पिस्तूल विक्री करणारी टोळी कोणती आहे? याचा तपास करण्यात येत आहे.

दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार
आरोपी अँड उपासना विजयसिंह परिहार यांच्या विरोधात वजिराबाद, नांदेड, अंबाजोगाई शहर येथे विविध कलमाखाली गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी अरुण रणजिकसिंह जमादार याच्यावर पोलीस स्टेशन गांधी चौक, लातूर येथे मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपीने गुन्ह्यात जप्त केलेली पिस्टल व जिवंत काडतूस कोठून आणले याबाबत तपास उपनिरीक्षक चाटे हे करत आहेत.

जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी कळंब पोलिसात ३०७, ५११, १२० ब, ३४, भादंवि सहकलम ३/२५, १९ (३), भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ नुसार अनधिकृत शस्त्र बाळगून जिवे मारण्याच्या उद्देशाने प्रयत्न केल्याच्या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा -धक्कादायक! अल्पवयीन मोलकरीणवर मालकाचा जंगलात बलात्कार; आरोपी अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details