उस्मानाबाद- स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल 14 लाख रुपयांच्या 44 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. शहरातील अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या बाजूस असलेल्या एका घरावर पोलिसांनी हा छापा टाकला. यावेळी शंकर भरत देवकुळे व त्याचा सहकारी अनिल उर्फ विठ्ठल मगर (दोघे रा. फकिरानगर) यांना ताब्यात घेण्यात आले.
दोघांकडे अधिक चौकशी केली असता, त्यांच्याकडे 14 लाख 56 हजार 990 रुपये किमतीच्या तब्बल 44 मोटारसायकली सापडल्या. यातील 33 मोटारसायकली पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील आहेत. 44 पैकी 11 मोटारसायकलींचा मूळ चेसी क्रमांक आणि इंजिन क्रमांक पुसून त्यावर त्याच मॉडेलच्या दुसऱ्या दुचाक्याचे क्रमांक लावत बनावट नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) तयार करण्यात आले आहेत.