नाशिक Zika Virus :काही दिवसांपूर्वी नाशिकमधील भारतनगर येथील एका तरुणाचे नमुने ‘झिका’ पॉझिटिव्ह आले. त्यानंतर या परिसरातील गर्भवती महिलांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू झाले. आतापर्यंत या पाहणीत भारतनगर परिसरात 19 संशयित गर्भवती महिला आढळल्या आहेत. दरम्यान, या संशयित 19 महिलांचे रक्त नमुने अधिक तपासणीसाठी पुण्याच्या ‘एनआयव्ही लॅब’कडं पाठविण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिलीय.
- ‘झिका’चे गर्भवती महिलांवर सर्वाधिक परिणाम होत असल्यामुळं वैद्यकीय विभागानं तीन किलोमीटर परिसरातील महिलांना मच्छरदाणी वापरण्याचा सल्ला दिलाय. तसंच आठवड्यातून एक दिवस घरात कोरडा दिवस पाळा, असं आवाहनदेखील आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय.
गर्भवती महिलांनी काळजी घेणं गरजेचं :‘झिका’ आजाराची लक्षणं जवळपास डेंग्यूसारखीच आहेत. हा आजार डास चावल्यामुळेच होतो. झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यास हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची पाळी शक्यतो येत नाही. पण तीन महिन्यांच्या गरोदर महिलेला याचा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. तसंच या विषाणुमुळं लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळं गर्भवती महिलांही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.