नाशिक - मालेगावातील कोरोनाबाधितांची संख्या झापाट्याने वाढत आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर देखील तालुक्यातील आकड्यावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. आज जिल्ह्यात नव्याने ३९ रुग्णांची वाढ झालीय. तसेच एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ६७१ वर पोहोचलाय. यातील फक्त मालेगावात ५३४ रुग्ण आहेत. महिला पत्रकार दिप्ती राऊत यांनी मालेगावमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच प्रशासकीय व्यवस्थापन यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजात संवाद स्थापन करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकमध्ये बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एसआरपीफच्या जवानांची टेस्ट देखील पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडलीय.
संपूर्ण शहर यंत्रमागावर अवलंबून
मालेगाव यंत्रमाग कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. तालुक्यात 2 लाख यंत्रमाग असून कामगार देखील त्याच प्रमाणात आहेत. आठ लाखांची लोकसंख्या असलेल्या मालेगावात मध्यम वर्गासोबतच सर्वसाधारण आणि गरीब नागरिकांची संख्या मोठी आहे. याचा परिणाम साथीच्या आजारांच्या प्रसारावर दिसतो.
लॉकडाऊनच्या पाचव्या दिवशी मालेगावातील कमलपुरा भागात एकाच कुटुंबातील 5 संशयित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले; आणि प्रशासन खडबडून जागे झाले. मात्र या दरम्यान प्रशासन आणि मुस्लाम समाजातील विसंवादामुळे बाधितांचा आकडा वाढत राहिला. आज फक्त मालेगावात ५३४ रुग्ण आहेत.