नाशिक : शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी टोळक्याच्या मारहाणीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही दिवस होत नाही तोच नाशिकमधील सिडको परिसरात 4 ते 5 अज्ञातांनी एका भाजी विक्रेत्यांची भरदिवसा हत्या केल्याची घटना गुरुवारी घडलीय. भाजी विक्रेत्यावर धारधार शस्त्रानं हल्ला झाल्यानं नाशिक शहर पुन्हा हादरलंय. या प्रकरणात पोलिसांनी चार तासात तीन संशयितांना ताब्यात घेतलंय.
युवकाची हत्या :मिळालेल्या माहितीनुसार, सिडको भागात असलेल्या लेखानगरमधील शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथे ही घटना घडलीय. संदीप आठवले (22 वर्षे) खून झालेल्या भाजी विक्रेत्याचं नाव आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्यानं संदीपवर धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. संदीपच्या छातीत, पोटात, मानेवर तब्बल 30 पेक्षा अधिकवेळा वार करण्यात आले. संदीपवर हल्ला करुन हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान या हल्ल्यात संदीपचा जागीच मृत्यू झाला. संदीपची हत्या का करण्यात आली याचे कारण अजून समजलेले नाही. नाशिक पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून संदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवलाय.