नाशिक -जिल्ह्यात बेमोसमी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका द्राक्ष आणि कांदा पिकावर झाल्याचे बघायला मिळत आहे. या बदलत्या हवामानामुळे द्राक्षाच्या मण्यांना तडे जाण्याची शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तवली असून या बदलत्या हवामानाचा फटका कांदा पिकालादेखील बसणार आहे. कांद्यावर रोग पडून कांदा पिकाची वाढ कमी होणार आहे. परिणामी उत्पन्न घटणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात असेच ढगाळ वातावरण राहिले, तर कांदा व द्राक्ष पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
द्राक्ष आणि कांद्याच्या प्रतवारीला फटका
सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्ष आणि कांद्याच्या प्रतवारीवर होणार असल्यामुळे उत्पादकाची पिकांना वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे. यावर्षी जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचा द्राक्षांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे नुकसान झाले. या नुकसानीतून द्राक्ष उत्पादक सावरत असताना वाचलेल्या बागा आता अवकाळीच्या शक्यतेमुळे संकटात सापडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती.त्यातून जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी आपल्या बागा महागड्या औषधांची फवारणी करून वाचविल्या. त्या आता चांगल्या परीने बहरल्या तर काही अखेरच्या टप्प्यात आहे.
बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान
जिल्ह्यातील दिंडोरी, निफाड, चांदवड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी आता ढगाळ हवामान निर्माण झाल्याने द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणात भुरी, डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत असल्याने द्राक्ष उत्पादकांकडून द्राक्ष बागा वाचविण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी सुरू आहे.