नाशिक- शहरातील अंबड परिसरात गाड्यांची तोडफोड करत समाजकंटकांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकमधील वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या नाशिक शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. घरफोडी, दुकानांची लूट, बँक दरोडा, हत्या, वाहनांची तोडफोड अशा घटनांनी नाशिक शहर हादरून गेले आहे.
शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांची प्रतिक्रिया यातच काल मध्यरात्री पुन्हा एकदा अंबड पोलीस ठाणे हद्दीत अंबड लिंक रोडवरच्या भागात समाजकंटकांकडून वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. कृष्णनगर, तुळजाभवानी मंदिर परिसरात दोन अज्ञात समाजकंटकांनी महागड्या गाड्यांची तोडफोड करत वाहनांचे मोठे नुकसान केले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून यातील दोन संशयित सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले आहेत. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचे भय कमी झाले की, काय असा सवाल आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे. लवकरात लवकर या आरोपींचा शोध घेऊन त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.