नाशिक- पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात आजही जात पंचायत अस्तित्वात असून अन्यायकारक निवाडा करत आहे. जात पंचायतीने फोन करून घटस्फोटाचा निर्णय मान्य करत सासरच्यांनी केवळ एक रूपया भरपाई देण्याचा घृणास्पद निवाडा सिन्नर येथे देण्यात आला आहे. त्यामुळे कायद्यापेक्षा जात पंचायत वरचढ ठरत आहे का, असा सवाल उपस्थित होतो. तसेच कायदा बासनात बांधून आजही जात पंचायती भरविल्या जात असल्याचे सिद्ध झाले आहे.
सासरकडून विवाहितेचा छळ - सिन्नर येथील अश्विनी नावाच्या महिलेचा लोणी (जि. अहमदनगर) येथे विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या व्यक्तींनी तिचा छळ केल्याने ती सिन्नरला माहेरी आली. ती परत येत नसल्याचे पाहून पतीकडील मंडळींनी घटस्फोट देण्याचे ठरवले. मात्र सासरच्यांना कायदेशीर मार्ग न अवलंबता जात पंचायातीसमोर हे प्रकरण ठेवले. त्यानुसार लोणी येथील वैदू समाजाची जात पंचायत भरवण्यात आली.
एक रूपयाची भरपाई - पंचायतीत विवाहितेला तिचा मुद्दा मांडण्यासाठी बोलावण्यात आले नाही. तिच्या अनुपस्थितीत जात पंचायतीने विवाहितेला न विचारताच एक फोन करून घटस्फोट झाल्याचे जाहीर केले. आणि सासरकडील मंडळींनी विवाहित महिलेला भरपाई म्हणून एक रूपया देण्यास सांगितले, अशी माहिती जात पंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदगुडे व अॅड. रंजना गवांदे यांनी दिली.