नाशिक - दिंडोरी तालुक्यातील वरखेडा परिसरामध्ये ऊसाच्या शेतात बिबट्याचे दोन बछडे आढळले. त्यामुळे या शिवारात मादीचा वावर असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. वनविभाग बिबट्याचा बंदोबस्त करीत नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील शेतकरी अशोक उफाडे यांच्या राजापूर शिवारातील उसाच्या शेतात उसाची तोडणी सुरू होती. त्यावेळेस उसतोड कामगारांना बिबट्यांची दोन बछडे आढळून आली. तसेच याठिकाणी दबा धरून बसलेल्या मादीने डरकाळी फोडली असता कामगारांनी तेथून पळ काढला. बछडे असलेल्या उसाच्या शेतात मादीचा वावर असल्याने नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. तालुक्यात गेल्या दोन वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यात चार बालकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच गायी, लहान वासरे आदी पाळीव प्राणी, कुञे यांच्यावर देखील हल्ले झाल्याच्या घटना वारंवार घडत आहे. तरीदेखील बिबट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने शेतकरी वर्गामध्ये वनविभागाविरोधात तीव्र नाराजी आहे. परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार होत असल्याने शेतात काम करणेही अवघड झाले आहे. याठिकाणी त्वरीत पिंजरा लावून बिबट्यांचा व नुकत्याच आढळल्या बिबट्याच्या बछड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.