नाशिक- उन्हाळ्याच्या सुट्टी चालू असल्याने विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पांडव लेण्याच्या डोंगराळ भागातील निसर्गरम्य वातावरणाची सैर करण्यासाठी जातात. परंतु, आज (मंगळवार) चौघेजण परवाना नसतानाही पांडवलेणी येथील डोंगरमाथ्यावर गेले आणि अडकून बसले.
पांडव लेणीवर अडकून बसलेल्या दोघांना अग्निशामक दलाच्या जवांनानी सुखरुप उतरवले - अग्निशमन
चौघेजण परवाना नसतानाही पांडवलेणी येथील डोंगरमाथ्यावर गेले आणि अडकून बसले. जवानांनी दोरखंड घेऊन डोंगर माथा गाठला आणि अडकलेल्या दोघांना दोरखंडाच्या साह्याने डोंगरावरून सुखरूप उतरवले.
पांडवलेणीपर्यंत जाण्यास पर्यटकांना मुभा आहे. मात्र, लेणी ओलांडून राखीव वनक्षेत्रात विनापरवानगी प्रवेश करुन डोंगरावर चढण्यास भारतीय वन कायद्यानुसार गुन्हा आहे. पांडव लेणी परिसरात ४ मित्रांनी आज (मंगळवार) दुपारी लेणी बघितल्यानंतर ट्रेकिंगचा थरार अनुभवायचा म्हणून डोंगरावर चढायचे ठरवले. निलेश कुलकर्णी, गर्व सावलाणी, वंश पंजाबी आणि मीत ककरेजा (राहणार भाभानगर) यांनी डोंगर सर करण्यास सुरुवात केली. निलेश आणि गर्व डोंगराच्या माथ्यावर पोहोचले. तर, वंश आणि मीत हे डोंगराच्या पायथ्यापासून काही उंचीवर थांबले. परंतु, खाली उतरताना त्यांना आपण सुखरुप पोहचू शकत नाही, असे निलेश आणि गर्वला जाणवले. त्यामुळे त्यांनी डोंगराच्या पायथ्याला थांबलेल्या वंश आणि मीतला कळविले.
वंश आणि मीतने ही गोष्ट परिसरातील नागरिकांना सांगितली. नागरिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांची मदत मागितली. काही वेळातच जलद पथकाचे कमांडो, सिडको अग्निशामक उपकेंद्राचे जवान पांडव लेणी डोंगरावर पोहोचले. जवानांनी दोरखंड घेऊन डोंगर माथा गाठला आणि अडकलेल्या दोघांना दोरखंडाच्या साह्याने डोंगरावरून सुखरूप उतरवले.