महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलिसांनी २० हजार रुपये लुबाडल्याचा व्यापाऱ्याचा आरोप, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - नाशिक

आपण मद्यप्राशन केले होते. नियमाचे उल्लंघन केले असेल तर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता धाक दाखवून पैसे घेतल्याचा आरोप ओमप्रकाश वर्मा यांनी व्हिडिओद्वारे केला आहे.

पोलिसांवर आरोप करताना व्यापारी

By

Published : May 29, 2019, 11:02 AM IST

नाशिक - कारवाईचा धाक दाखवून नाशिकरोड पोलिसांनी खिशातून २० हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप ओमप्रकाश वर्मा या व्यापाऱ्याने केला आहे. याबाबत पोलिसांच्या नियंत्रण कक्षाकडे तक्रार केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

पोलिसांवर आरोप करताना व्यापारी

नाशिकरोड येथे जुन्या स्टेट बँक मार्गावरील एका हॉटेलमधून ओम प्रकाश वर्मा हे रात्री च्या सुमारास मद्यप्राशन करून घरी जात होते. यावेळी दोन पोलिसांनी त्यांना मद्यप्राशन केल्याने पोलीस ठाण्यात चलायला सांगितले. पोलीस ठाण्यापर्यंत नेत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या खिशातून २० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्यात नेऊन व्यापाऱ्याला धाक दाखवण्यात आला. यानंतर काही वेळाने त्याला रजिस्टरवर सही घेऊन सोडून देण्यात आले, असे व्यापाऱ्याने म्हटले आहे.

आपण मद्यप्राशन केले होते. नियमाचे उल्लंघन केले असेल तर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता धाक दाखवून पैसे घेतल्याचा आरोप ओमप्रकाश वर्मा यांनी व्हिडिओद्वारे केला आहे. यासंदर्भात नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी या व्यापाऱ्याने केली आहे.

काही महिन्यांपूर्वीच नाशिकमध्ये नवनियुक्त आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. कार्यतत्पर म्हणून नांगरे यांची सर्वत्र ओळख आहे. मात्र, नाशिकमध्ये तसे होताना दिसून येत नाही. नाशिकमध्ये गेल्या महिनाभरापासून गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. चेन स्नाचिंग, चोरी, घरफोडी यांसारख्या घटना वाढल्या आहेत. तर दुसरीकडे पोलीस खात्यातील कर्मचारी सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे लुबाडत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता 'कुंपणच शेत खात' असेच म्हणावे लागेल. नाशिक रोड पोलीस ठाण्याचा कारभार सध्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे चांगलाच गाजत आहे. सिन्नर फाटा येथे वाहतूक पोलिसांनी काठी फेकून मारलेला युवक कोमात गेल्याचे प्रकरण ताजे आहे. त्यातच २ पोलिसांनी व्यापाऱ्याला कारवाईचा धाक दाखवून खिशातून वीस हजार रुपये काढून घेतल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. आता आयुक्त विश्वास नांगरे पाटील यावर काय कारवाई करतात? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details