मनमाड (नाशिक) -लॉकडाऊन अनलॉक करण्यात आल्यानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यासह विदेशात कांदा निर्यातीचा मार्ग मोकळा झाला असून त्यामुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्यापाऱ्यांनी मनमाडच्या माल धक्क्यावरून प्रथमच १५ मालगाडीच्यामधून तब्बल २५ हजार टनपेक्षा जास्त कांदा थेट बांगलादेशात पाठविला आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यात देखील मोठ्या प्रमाणात ट्रकच्या माध्यमातून कांदा पाठविला जात आहे. कांदा निर्यात खुली होऊन भावात वाढ होईल, अशी शेतकऱ्यांना अशा होती. मात्र, कांद्याच्या भावात वाढ होण्याऐवजी त्यात घसरण होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
मनमाडसह जिल्ह्यातील इतर भागातील व्यापारी सर्वात जास्त कांदा बांगलादेशात निर्यात करतात. यापूर्वी ते पश्चिम बंगालला कांदा पाठवीत होते. तेथून बांगलादेशात कांदा पाठविला जात होता. मात्र, यंदा प्रथमच मनमाड येथून थेट बांगलादेशात मालगाडी पाठविण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे व्यापारी थेट बांगलादेशात कांदा पाठवीत आहे. आतापर्यंत मनमाड येथून सुमारे १५ मालगाडीमधून कांदा पाठविण्यात आला आहे. एका मालगाडीच्या रॅकमध्ये ४२ डबे असतात. एका डब्याची क्षमता सुमारे ४० टनाची असते. त्यामुळे आतापर्यंत मनमाडच्या माल धक्क्यावरून बांगला देशात ६३० डब्यातून २५ हजार २०० टन कांदा निर्यात करण्यात आला आहे.