नाशिक -कोरोनामुळे सध्या नियमित शाळा बंद असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून शाळेची फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षण पुढील सात दिवसानंतर बंद करण्याचा निर्णय नाशिक स्कूल असोसिएशनने घेतला आहे. मात्र, कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश खंडित केला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात शिक्षक उपसंचालक नितीन उपासनी यांना नाशिक स्कूल असोसिएशनने निवेदन दिले आहे.
शिक्षकांचे वेतन व अन्य खर्च देखील भागवणे झाले कठीण
कोरोना काळात महाराष्ट्रात बहुतेक खासगी शाळा मिशन ऑनलाइनमध्ये विद्यार्थ्यांना गेल्या आठ महिन्यांपासून नियमित शिक्षण देत आहे. मात्र, त्याचा फारसा फायदा होत नसल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या असून अनेक पालक फी भरण्यासाठी देखील पुढे येत नाही. अशात अनेक शाळांनी देखील आठ महिन्यांपासून शुक्ल मागितले नाही. मात्र, आता सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत झाले असून शाळांकडून पालकांकडे फीसाठी मागणी होत आहे. मात्र, शाळा नियमित सुरू झाल्या नसल्याने अनेक पालक फी भरण्यास नकार देत आहे. दुसरीकडे शाळा व्यवस्थापन काटकसरीने कारभार चालवत असून शिक्षकांचे वेतन आणि अन्य खर्च देखील भागवणे कठीण झाल्याने जे पालक आपल्या मुलांची फी भरणार नाही अशा मुलांना ऑनलाइन शिक्षण देणे बंद करण्यात येईल, असा निर्णय नाशिक स्कूल असोसिएशनने घेतला आहे. याबाबत शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांना निवेदन देण्यात आले.