नाशिक- आजकाल चोरी, फसवणूक अशा घटना मोठ्याप्रमाणात वाढले आहे. पण, अशा काळातही प्रामाणिक माणसांचे दर्शन घडत असते. असाच एक प्रसंग नाशिक जिल्ह्यातील वणी गावात पाहायला मिळाला. एका लॉन्ड्रीवाल्याने इस्त्रीच्या कपड्यांमध्ये चुकून आलेले दागिन्यांचा पाकिट परत केले. त्यामध्ये ३ लाखांचे दागिने होते. त्यांच्या या प्रामाणिकपणाची गावामध्ये चर्चा होत आहे.
लॉन्ड्री चालकाचा प्रामाणिकपणा, ३ लाखांचे दागिने केले परत
नाशिक येथील वणी गावातील लॉन्ड्री चालकाने प्रामाणिकपणेचा दर्शन घडवत ग्राहकाचे तीन लाखांचे दागिने परत केले.
जिल्ह्यातील वणी गाव येथील शनि चौकात प्रकाश हिरामण आहेर यांचे लॉन्ड्रीचे दुकान आहे. या गावातील रहिवासी राजू परदेशी यांच्या घरी विवाह सोहळा असल्याने सोलापूरहून पाहुणे आले होते. त्यापैकी एक असलेले नितीन सिंग यांनी लॉन्ड्री चालक यांच्याकडे इस्त्रीसाठी कपडे टाकले होते. मात्र, या कपड्यात आहेर यांना सोन्याचे दागिने आढळून आले. त्यांनी घडलेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला. सर्वांनी सोनाराकडे जाऊन दागिने खरे असल्याचे पडताळून घेतले. तेव्हा सर्वांनी या पाहुण्यांना बोलावून तीन लाख रुपये किंमतीचे हे दागिने नितीन सिंग यांना परत केले.
त्यात एक कर्णफुल, 6 अंगठ्या, 1 नेकलेस, 2 चैन असे एकूण 95 ग्रॅमचे दागिने होते. नितीन सिंग यांनी लॉन्ड्री चालकाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लॉन्ड्री चालक प्रकाश आहेर यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचा ग्रामस्थांना अभिमान वाटत असून यामुळे गावाची प्रतिष्ठा वाढल्याची भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी दाखवलेल्या प्रमाणिपणेबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.