नाशिक- पेठ तालुक्यातील आसरबारी जवळील हरणगाव येथील ५ मुली रविवारी सांयकाळी ५ वाजता धरणात कपडे धुण्यास गेल्या होत्या. त्यानंतर त्या मुली पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरल्या. त्यापैकी एकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ज्योती तुकाराम जाधव (वय 12) असे या मुलीचे नाव आहे.
यात बुडालेल्या मुलीचा मृतदेह शोधण्याचे काम रात्री ऊशीरापर्यंत चालू होते. अखेर रात्री नऊच्या सुमारास ज्योतीचा मृतदेह गावातील पट्टीच्या पोहणाऱ्या मुलांनी धरणातून बाहेर काढला. ज्योतीचे वडील तुकाराम जाधव हे कल्याण येथे पोलीस दलात कार्यरत आहेत.
रविवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास आसरबारी येथील धरणात कपडे धुण्यासाठी पाच मुली गेल्या होत्या. कपडे धुवून झाल्यानंतर या पाचही मुली पोहण्यासाठी धरणात उतरल्या. यातील ज्योती जाधव, जयश्री भुसारे, साक्षी भुसारे, अर्चना जाधव, दिक्षा जाधव असे त्यांची नावे आहेत. पाण्याचा अंदाज न आल्याने यातील ज्योती जाधव तिच्यासह साक्षी भुसारे ही मुलगी पाण्यात बुडाली. योगायोगाने उपस्थित असलेल्या देवानंद गायकवाड या बारा वर्षीय मुलाने साक्षीला पाण्याबाहेर काढले. मुली पाण्यात बुडाल्याची माहिती आसबारी गावात मिळताच अनेकांनी धरणाकडे धाव घेतली.
यातील साक्षी व जयश्री या दिंडोरी तालुक्यातील सादराळे या गावातील रहिवासी होत्या. सुट्टीनिमित्त त्या मामाकडे आल्या होत्या. ज्योतीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी कायरे सादरपाडा येथील पट्टीच्या पोहणाऱ्या मुलांना बोलवण्यात आले होते. या घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी पेठ पोलीस ठाण्याला दिली. रात्री नऊ वाजेच्या सुमारास मृतदेह हाती लागला.