नाशिक - नाशिक मध्ये जाळपोळीचे सत्र अजूनही सुरुच आहे. पंचवटी येथील भगवती नगर भागातल्या गुरुकृपा बंगल्याच्या बाहेर उभी असलेली टाटा हेक्झा ही चारचाकी गाडी रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी जाळल्याची घटना समोर आली आहे.
नाशिकमध्ये गाड्या जाळपोळीचे सत्र सुरुच; पंचवटी भागात बंगल्याच्या बाहेर उभी चारचाकी जाळली - टाटा हेक्झा
दोन ते तीन दिवसांपूर्वीच म्हसरुळ परिसरातील बोरगड वाढणे कॉलनी भागात असलेल्या भास्कर सोसायटीत देखील तीन दुचाकी गाड्या जाळल्याची घटना उघडकीस आली होती. आता भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहितीनुसार, नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याचा व्यापार करणारे दिलीप अंबरपुरे (रा.गुरुकृपा बंगला,भगवती नगर) हे काल रात्री नित्यनियमाने आपले कामकाज उरकून घरी आले. त्यांनी आपली टाटा हेक्झा (एमएच 15 जीएफ 8089) ही बंगल्याच्या बाहेर पार्क केली. त्यानंतर रात्री दीड ते दोनच्या सुमारास, जोराचा आवाज झाल्याने अंबरपुरे कुटुंब तसेच जवळपासचे नागरिक जागे झाले. काहीतरी जळाल्याचे समजतात अंबरपुरे यांनी बंगल्याबाहेर धाव घेतली. आपल्या गाडीवर कोणीतरी पेट्रोल टाकून जाळल्याचे लक्षात येताच त्यांनी सदर बाब तात्काळ पोलिसांना आणि अग्निशमन दलाला कळविली. पंचवटी अग्निशमन दलाच्या अमृतधाम उपकेंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली.
भरवस्तीत घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे दोन ते तीन दिवसांपूर्वीच म्हसरूळ परिसरातील बोरगड वाढणे कॉलनी भागात असलेल्या भास्कर सोसायटीत देखील तीन दुचाकी गाड्या जाळल्याची घटना उघडकीस आली होती.