नाशिक -कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून संपूर्ण राज्यात चर्चेत आलेले मालेगाव आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. संपूर्ण जिल्ह्याची चिंता वाढवणारे मालेगाव आता हळूहळू पूर्व स्थितीत येत आहे. काही दिवसांपूर्वी अतिशय वाईत परिस्थितीमध्ये असलेल्या मालेगावचे प्रश्न सोडवण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस आणि प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. शहरातील नागरिकांचे प्रबोधन, मदतीची उभारणी आणि कोरोना विरुद्धचा संघर्ष तीव्र करण्यासाठी लोकांना सहभागी करुन घेण्यात सुनील कडासने यांनी जीवतोड प्रयत्न केले.
नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना राज्य सरकारने सुनील कडासने यांची कोरोना युद्धासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती केली. सुनील कडासने यांच्यासारख्या समाजातील विविध प्रश्नांना भिडून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे लोकांमध्ये जागृती आणि विश्वास निर्माण करण्यास मालेगाव प्रशासनाला यश आले. लोकांचा विश्वास संपादन, समस्या आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया त्यांच्या नियुक्तीमुळे मालेगावात खऱ्या अर्थाने सुरू झाली. कडासने यांच्या प्रयत्नांना शासनाने यशस्वी मॉडेल म्हणून स्वीकारले. त्यामुळे मालेगावात कोरोनाला रोखण्यात यश मिळू शकले.