नाशिक - शहरात सध्या स्मार्ट रस्ते निर्मिती सुरू आहे. मात्र, हे स्मार्ट रस्ते नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. दीड वर्षे उलटूनही ठेकेदारांकडून रस्ता पूर्ण होत नसल्याने नागरिकांसह स्मार्ट सिटीचे अधिकारी देखील हतबल झाले आहेत.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रोडवर स्मार्ट रोडचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. जागतिक दर्जाचा हा रस्ता असून विविध सेवा यामध्ये दिल्या जाणार आहेत. मात्र 18 महिने उलटून ही रस्त्याचे काम पूर्ण होत नाहीये.
या रस्त्यावर सरकारी कार्यालय, शाळा महाविद्यालय, बसस्थानक आणि न्यायालय असून हा शहरातील अत्यंत वर्दळीचा हा रस्ता आहे. रस्त्याची कामे सुरू असल्याने व्यावसायिकांना आपली दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे.
नाशकातील स्मार्ट रोड शहरवासीयांसाठी ठरतोय डोकेदुखी स्मार्ट रोडचे काम संथ गतीने सुरू असल्याने स्मार्ट सिटी च्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला नोटीस पाठवल्या होत्या. आतापर्यंत चार वेळेस नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. तरीदेखील रस्त्याच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याने धिकाऱयांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. याचबरोबर स्मार्ट रोडमुळे जो त्रास नाशिकरांना सहन करावा लागत आहे, त्याबद्दल अधिकारी माफी मागत आहेत.
दरम्यान, पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडे रेटा लावून कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. अन्यथा अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील नोटीस सत्र हे नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरणार असून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना नागरिकांच्या या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.