नाशिक- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होत आहे. आदिवासी पाड्यावरील नागरिकांनाही यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. रोजगार नाही म्हणून हातात पैसे नाही आणि पैसे नाही म्हणून अन्न नाही, अशी परिस्थिती सध्या आदिवासी पाड्यांवर आली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे हद्दीतील जंगलात राहणारे एक कातकरी कुटुंब आहे. लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून कुटुंबातील लोकांना काम नाही. तुटपुंज्या पैशावर चार दिवस चूल पेटली आणि मग सुरु झाली जगण्यासाठी धडपड. गेले काही दिवस हे कुटुंब जंगलातील कंदमुळे खाऊन आपली भूक भागवत होते.
याची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकत्यांना समजल्यावर जंगलात राहणाऱ्या या कुटुंबाला मदत करण्यासाठी तानाजी शिंदे हे त्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा त्यांच्या समोरील चित्र अतिशय भयानक होते .9 सदस्यांचे कुटुंब असलेल्या या लोकांचे घर अवघ्या चार काठ्यांवर उभे होते. तीन विटांची चूल आणि चार भांडी. कोणी तरी आपल्या मदतीसाठी आले म्हणून कुटुंबातील चिमुकल्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. हे भीषण वास्तव बघून तानाजी यांनी लगेचच स्वतः ह्या कुटुंबाला पुढील 15 दिवस पुरेल इतका किराणा देऊ केला.
या कुटुंबाकडे ना आधारकार्ड, ना रेशनकार्ड. शहरात तरी गरिबांच्या मदतीला सरकार सहसामाजिक संस्थेचे शेकडो हात पुढे येत आहेत. मात्र, ज्यांच्या डोक्यावर छतच नाही त्यांनी काय करायचे. जीवनाचा लढा लढायचा तरी कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.