मनमाड - देशभरातून कामासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांचे लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात हाल सुरू होते. शासनाने मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी विशेष बससेवा व श्रमिक रेल्वे सुरू केल्या आहेत. मजुरांच्या अडचणींसंबधी 'ईटीव्ही भारत'ची बातमी प्रसिद्ध होताच, प्रशासनाने दखल घेत श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना विशेष पासेस उपलब्ध करून मूळ गावी पाठवले आहे.
शहरासह तालुक्यातील अनेक गावामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील परप्रांतीय मजूर अडकलेले होते. या स्थलांतरित कामगारांच्या वैद्यकीय चाचण्या केल्यानंतरही त्यांना मूळ गावी पाठवण्यासाठी प्रशासनाकडून वाहतूक व्यवस्था करण्यात आली नव्हती. यामुळे कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत 'ई टीव्ही भारत'ने "साहब खाना नहीं दिया तो भी चलेगा, मगर हमें गाव भेजना का बंदोबस्त करो" या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत, आज नांदगाव तालुक्यातील जवळपास ७५ परप्रांतीय मजुरांना विशेष बसद्वारे नाशिकरोड येथे रवाना करण्यात आले असून तेथून श्रमिक विशेष रेल्वेने सर्वांना बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड या राज्यांत पाठविण्यात आले आहे.