नाशिक - पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातील सर्व प्रकारच्या मॉलमध्ये निशुल्क वाहनतळ व्यवस्था करावी, यासाठी नाशिकमधील शिवसेना नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आजच्या महासभेत नगरसेवकांनी मॉलमध्ये वाहनतळ व्यवस्था करण्याची मागणी केली. मात्र, महासभा तहकूब झाल्याने नगरसेवकांनी सभागृहातच फलक झळकावून निदर्शने केली. त्यामुळे पुण्यापाठोपाठ आता नाशिकमध्येही निशुल्क पार्किंगचा विषय चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाशिक: मॉलमध्ये मोफत वाहनतळासाठी शिवसेना आक्रमक
पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातील सर्व प्रकारच्या मॉलमध्ये निशुल्क वाहनतळ व्यवस्था करावी, यासाठी नाशिकमधील शिवसेना नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
व्यावसायिक दुकानदारांनी आपल्या ग्राहकांना वाहनतळाची सुविधा देणे, अभिप्रेत असते. परंतु, शहरातील मॉलधारक ग्राहकांकडून दुचाकीला 20 तर चार चाकीचाकीसाठी 30 ते 40 रुपयांची आकारणी केली जाते. या माध्यमातून सामान्य ग्राहकांची मोठी लूट होत, असल्याचा मुद्दा मांडत नाशिकमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी शहरातील सर्व मॉलमध्ये वाहनतळाची सुविधा मोफत करावी, असा प्रस्ताव आजच्या महासभेत मांडला. मात्र, महापौरांनी आचारसंहितेचे कारण देत आजची सभा तहकूब केली. त्यामुळे शिवसेनेच्या संतप्त नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत सभागृहात गोंधळ घातला. तसेच येत्या 15 दिवसात यावर निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
शिवसेना नगरसेवकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर शहराच्या महापौर रंजना भानसी यांनी आचारसंहिता संपताच शहरातील मॉल मधील पार्किंगच्या शुल्काबाबत नागरिकांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे.