नाशिक - राज्य सरकारकडून कोरोनाच्या धर्तीवर यंदाच्या वर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्यावर काही निर्बंध लावले आहेत. नाशिकमधील शिवभक्तांनी या निर्णयाचा निषेध करत ठिय्या आंदोलन केले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना आंदोलक. शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यावर ठाम -
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमावलीवर शिवभक्त नाराज झाले आहेत. नाशिकच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शिवभक्तांनी ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केली आहे. नियमावली किती ही लावा आम्ही शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यावर ठाम आहे, असे शिवभक्तांचे मत आहे.
हेही वाचा -कर्जबाजारीपणामुळे नवऱ्याने केली आत्महत्या; बायकोला हाकावा लागतोय कुटुंबाचा गाडा
पालकमंत्र्यांच्या होकारानंतर पोलिसांचा मिरवणुकीला नकार -
भद्रकाली पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत शिवजयंती मिरवणूक बंदी व केवळ प्रतिमापूजनालाच परवानगी मिळणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर शुक्रवारी शिवजयंती उत्सव मंडळाने या निर्णयाच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. जानेवारी महिन्यात पालकमंत्री छगन भुजबळ आणि जिल्हा प्रशासन, शिव उत्सव मंडळात बैठक झाली होती. या बैठकीनंतर पालकमंत्री भुजबळ शिवजयंतीला सर्व जुन्या मंडळाच्या कार्यक्रमाना परवानगी देणार असल्याचे सांगत सर्व शिवभक्तांनी शिवजयंतीची जय्यत तयारी केली होती. मात्र, पोलिसांनी आता मिरवणूकीला परवानगी देता येणार नाही, असे सांगितले आहे.
पारंपरिक वाद्यांवर मिरवणूक काढणार -
पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरीही कोणत्याही परिस्थितीत मिरवणूक काढणारच, असा पवित्रा शिवजयंती साजऱ्या करणाऱ्या मंडळाने घेतल्याने पोलिसांसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचा धांगडधिंगा न घालता पारंपरिक वाद्यांवर मिरवणूक काढणार असल्याचे जुने नाशिक शिवजन्मोत्सव समितीने सांगितले आहे.