महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केंद्र सरकारशी बोलून दोन दिवसात कांद्याचा तिढा सोडवणार, शरद पवारांचे आश्वासन - Onion storage restrictions

शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकच्या आडगाव भुजबळ नॉलेज सिटीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी यांच्या प्रमुख प्रतिनिधींची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी शेतकरी आणि व्यापारी यांच्या व्यथा समजून घेतल्या.

शरद पवार
शरद पवार

By

Published : Oct 28, 2020, 5:29 PM IST

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी दिवंगत नेते विनायक दादा पाटील यांचा कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी यांची एकत्रित बैठक घेत येत्या २ दिवसात कांद्याचा तिढा सोडवण्याचे आश्वासन दिले.

शरद पवार यांच्या उपस्थितीत नाशिकच्या आडगाव भुजबळ नॉलेज सिटीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापारी यांच्या प्रमुख प्रतिनिधींची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी शेतकरी आणि व्यापारी यांच्या व्यथा समजून घेतल्या. बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना येत्या दोन दिवसात कांद्याच्या वादावर तोडगा काढण्यासाठी केंद्रातील संबधित अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढू, असे आश्वासन दिले. शिवाय व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होऊ न देता बाजार समित्या सुरू करण्याची विनंती केली.

माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार

केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवरील निर्बंध हटवले पाहिजे

नाशिक जिल्ह्यात कष्टकरी शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांनी जास्त अपेक्षा करू नये. कांदाप्रश्नी सगळे निर्णय केंद्र घेत असते. मग निर्यातीचा असो किंवा आयातीचा. कांदा साठवणुकीवरील निर्बंध केंद्र सरकारने हटवले पाहिजे. यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

भुजबळ नॉलेज सिटीमध्ये पार पडलेल्या बैठकीत माजी खासदार समीर भुजबळ, विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, सरोज आहेर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे आदी पदाधिकाऱ्यांसह नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व जिल्ह्यातील कांदा व्यापारी उपस्थित होते.

उद्या जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक

बैठकीनंतर उद्या जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक होणार असून या बैठकीनंतर नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदीबाबतचा निर्णय होणार आहे. त्यामुळे, आजच्या बैठकीनंतर उद्या होणार्‍या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

कांदा साठवणुकीवर लावण्यात आलेले निर्बंध मागे घ्यावेत

आज नाशिक जिल्ह्यात केवळ १० ते १५ टक्के उन्हाळी कांदा शिल्लक आहे. त्यामुळे, कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून किरकोळ बाजारात ९० ते १०० रुपये किलो कांदा विकला जात आहे. तसेच, अवकाळी पावसामुळे नवीन लाल कांदा येण्यास उशीर झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, केंद्र सरकार साठवणुकीसंदर्भात निर्बंध आणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करत असल्याचा आरोप शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केला आहे. कांदा साठवणुकीवर लावण्यात आलेले निर्बंध मागे घ्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शिल्लक कांद्याचे करायचे काय?

केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर निर्बंध लावल्याने नाशिक जिल्ह्यातील पंधरा बाजार समिती व्यापाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून कांद्याचे लिलाव बंद ठेवले आहेत. केंद्र सरकारने कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा साठवणुकीवर निर्बंध लावले. निर्णयात मोठ्या व्यापाऱ्यांना २५ टन आणि लहान व्यापाऱ्यांना २ टन कांदा साठवणुकीचे निर्बंध लावण्यात आले आहेत. आज नाशिक जिल्ह्यातील बहुतांश व्यापाऱ्यांकडे २५ टन पेक्षा अधिक कांदा असून त्या कांद्याचे करायचे काय? असा प्रश्न सरकारला विचारत व्यापाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद ठेवल्या आहेत.

हेही वाचा-सलग दुसऱ्या दिवशी नाशिकमधील कांदा लिलाव बंद; शेतकऱ्यांच्या काळजीत भर

ABOUT THE AUTHOR

...view details