नाशिक - निफाड तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांनी जीवाची परवा न करता ऊसाच्या शेतात मिळून आलेल्या बिबट्याच्या बछड्यासोबत चक्क सेल्फी काढत हा व्हिडिओ व्हायरल केला. याचदरम्यान बिबट्याने मुलांवर हल्ला केला असता तर मोठा अनर्थ झाला असता, अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहे.
मादी जवळ असती तर...
निफाड तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळत असल्याने या भागात बिबट्यांची संख्या मोठी आहे. अनेकदा या भागात बिबट्यांकडून नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडत असतात. अशात कुरुडगाव शिवारात सध्या ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याचे बछडे आढळले. मात्र ऊसतोड कामगारांच्या मुलांनी या 4 ते 5 महिन्याच्या बछड्याला उचलून घेत थेट जीवाची पर्वा न करता सेल्फी काढले. एवढ्यावरच न थांबता काढलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याने याची चर्चा जरी होत असली, तरी यादरम्यान बिबट्याची मादी जवळ असती आणि हल्ला केला असता तर काय अनर्थ झाला असता हे सांगायला नको. त्यामुळे नागरिकांनीदेखील अतिउत्साहात जीवावर उदार होणे टाळावे, असे वनविभागाचे म्हणणे आहे.