मुंबई :काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने काँग्रेस राजकीय कोंडीत अडकला आहे. या मतदारसंघात भाजपने आपला उमेदवार दिलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून सत्यजित तांबे हे भाजपच्या तिकीटावर या मतदारसंघात निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू होत्या; मात्र शेवटच्या क्षणी सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज ही भाजपची खेळी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे. भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघातून अधिकृत उमेदवार घोषित केलेला नाही. अखेरच्या क्षणापर्यंत एबी फॉर्मही कुणाला दिला गेला नाही. पाकळ्या मिटून घेण्याचे हे नवे ऑपरेशन कमळ म्हणावे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करून भाजपला विचारला आहे.
भाजपचे राकॉंला प्रत्युत्तर :दिलीप वळसे पाटील यांनी भाजपवर केलेल्या टीकेला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील उत्तर दिले आहे. आधी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या घरात बघावे. शरद पवार यांनी अनेकांची घर फोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती केली. त्यामुळे दिलीप वळसे पाटील भाजपवर करत असलेल्या टीकेला महत्त्व उरत नाही, असा टोला देखील केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.
कॉंग्रेसचा तांबेंवर कारवाईचा इशारा :नाशिकच्या पदवीधर मतदारसंघात काँग्रेसकडून उमेदवार म्हणून सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले होते; मात्र सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. उलट सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. मात्र सत्यजित तांबे हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नाहीत. तांबे कुटुंबीयांनी काँग्रेस पक्षाला दगा दिला असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. तसेच सुधीर तांबे यांनी अधिकृत उमेदवार घोषित केल्यानंतर देखील आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. यावरून सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत.