सटाणा (नाशिक)-बागलाण तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाचा तपास अवघ्या २४ तासात लावण्यात सटाणा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी प्रेयसी व प्रियकराला अटक करण्यात आली आहे. हर्षदा अरुण सोनवणे (वय 26 रा. चौगाव रोड, सटाणा) व रवि सुरेश खलाले (वय 36 रा.मंगल नगर, सटाणा) असे अटक करण्यात आलेल्या प्रेयसी व प्रियकराचे नाव आहे. मृताचे नाव मृत राजू सरदार असे आहे.
गुरुवारी (14 मे) सकाळी सात वाजता दोधेश्वर घाटात इंडिगो मांझा कारमध्ये एक मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याची माहिती सटाणा पोलिसांना मिळाली होती. ही कार सटाणा शहरातील सम्राट म्युझिकलचे संचालक राजू सरदार यांची असल्याची खात्री होताच सटाणा पोलिसांनी राजू सरदार यांच्या कुटुंबीयांना याची माहिती देत घटनास्थळावर पाचारण केले होते. मृत राजू सरदार यांच्या शरीरावरील जखमा आणि इतर परिस्थिती पाहता त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. राजू सरदार यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार सटाणा पोलिसांनी 302 कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
दोधेश्वर घाटात याच गाडीत मृतदेह आढळून आला होता.
मृत राजू सरदार यांच्या मोबाईल क्रमांकाची माहिती नाशिक सायबर पोलिसांना दिली असता रात्री अकरा वाजता त्यांचा मोबाईल बंद झाला होता. सायबर पोलिसांनी मोबाईल बंद होण्यापूर्वी त्यांच्या संपर्कात कोण आले, याचा सखोल अभ्यास करून शेवटी आलेल्या कॉलची तपासणी केली असता सटाणा शहरातील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा हा फोन असल्याची खात्री सटाणा पोलिसांना झाली. या अल्पवयीन विद्यार्थ्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता या विद्यार्थ्यांची मामी हर्षदा अरुण सोनवणे (वय 26) ही माझा मोबाईल रात्री साडेदहा वाजल्यापासून ताब्यात घेऊन घराबाहेर गेल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी हर्षदा सोनवणेला ताब्यात घेतले.
आरोपी हर्षदा सोनवणे हिच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता सन 2013 पासून तिचे रवि खलाले (रा.मंगल नगर,सटाणा.व्यवसाय टुरिस्ट कार चालक) याच्याशी प्रेमसंबंध असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. गेल्या अडीच महिन्यांपासून मृत राजू सरदार फोन करून त्रास देत असल्याने प्रियकर रवी खलालेशी संगनमत करून हा खून केल्याची कबुली हर्षदा सोनवणेने पोलिसांना दिली. ...असा केला खून
प्रियकर रवी खलाले व प्रेयसी हर्षदा सोनवणे या दोघांनी राजू सरदार यांच्या खुनाचा कट रचला. 13 मे रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हर्षदा सोनवणे हिने राजू सरदार यांना फोन करून नामपूर रोडच्या बागलाण अकॅडमी जवळ बोलवले. राजू सरदार त्यांच्या इंडिगो मांझा कारने बागलाण अकॅडमी जवळ पोहोचले असता हर्षदा सोनवणे त्यांच्या कारमध्ये पुढील सीटवर बसली. तेथेच प्रियकर रवि अंधारात लोखंडी हत्यारासह दबा धरून उभा होता. हर्षदा हिने राजू सरदार यांना कार दोधेश्वर-कोळीपाडा रोड कडे घ्यायला लावली. कोळीपाडा रोडवर कार आली असता हर्षदा हिने कार उभी करायला लावली. कार उभी करून आरोपी हर्षदा सोनवणे व राजू सरदार बाहेर येताच मागून पल्सर वर आलेल्या रवी खलाले याने लोखंडी हत्याराच्या साह्याने राजीव सरदार यांच्या डोक्यात वार करून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर दोघांनी राजू सरदार यांना मृत अवस्थेत उचलून त्यांच्याच कारमधील मागील सीटवर त्यांचा मृतदेह ठेवला. रवीने टाटा मांझा कार तर हर्षदाने स्वत: रवीची मोटारसायकल चालवित दोधेश्वर घाटात आले. तेथे त्यांनी राजेंद्रचा मृतदेह असलेली कार न्यूट्रल करून तिला घाटात ढकलून दिले आणि मोटारसायकलने घरी पोहोचले, अशी कबुली त्यांनी पोलिसांनी दिली.