नाशिक - संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने मंगळवारी सकाळी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. पहाटेच्या सुमारास पारंपरिक पूजा विधी झाल्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित ही पालखी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली.
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान - Palkhi
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने टाळ-मृदंगाच्या गजरात हजारो वारकऱ्यांसह आज पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो वारकरी, त्यांच्या हातात असलेले भगवे ध्वज मुखी विठुनामाचा गजर, अशा भक्तीमय वातावरणात पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली. दुसरीकडे यंदाच्या वर्षीही वारी निर्मल वारी म्हणून यशस्वी करण्यासाठी वारकरी प्रयत्न करणार आहेत. ज्या गावातून वारी जाईल, त्या गावात वृक्षारोपण करणार, अशी माहिती वारकरी संप्रदायाच्या वतीने देण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देखील जवळपास ५ लाख रेनकोट वारकऱ्यांना वाटून यंदाच्या वारीमध्ये आपली सेवा अर्पण केली आहे.
त्रंबकेश्वरमधून निघालेली निवृत्तीनाथ महाराजांची पालखी २४ दिवसांचा प्रवास करत पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. आजचा पालखीचा मुक्काम नाशिकच्या सातपूर परिसरात असून त्यानंतर ती नगर मार्गे पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहे.