मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन चांदवड (नाशिक) : कांद्याला 2500 रुपये हमीभाव द्यावा विकलेल्या कांद्याला किमान 1500 रुपये तात्काळ अनुदान देण्यात यावे, नाफेडमार्फत प्रत्यक्ष कांदा खरेदी करून 2500 रुपये भाव द्यावा द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना प्रतिकिलो 25 रुपये अनुदान द्यावे, यासह शेतमालाला भाव मिळावा या मागणीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथे मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
तहसिलदारांना निवेदन :देशातील मोदी सरकार व केंद्रातील शिंदे फडणवीस सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असुन आज कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. यामध्ये फायदा तर सोडा जी लागत कांदा लागवडीसाठी झाली ती देखील निघत नसल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांसमोर उरलेला नाही, असे मत व्यक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप काका बनकर यांनी व्यक केले. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
हमीभावाची मागणी : स्व. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कांद्याचे भाव घसरले होते. नाशिक जिल्ह्यातील आमदारानी त्यावेळी सभागृहात गदारोळ करत व्हेलमध्ये जाऊन कामकाज बंद पाडले. त्यावेळी विलासराव देशमुखांनी 2 तासाची वेळ घेतली व जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात विकलेल्या कांद्याला 200 रुपये अनुदान जाहीर केले होते. नुसते जाहीर नाही केले तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले होते. आज त्यांची आठवण शेतकरी करत असुन आम्हाला हमीभाव तर द्या, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
शेतकऱ्यांपुढे समस्या :कांदा पिकाचे उत्पादन घेण्यासाठी एकरी किमान 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो. मात्र, सध्या सुरू असलेल्या भावामुळे उत्पादन शुल्क तर सोडा वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे असेच सुरू असले तर करावं तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
हेही वाचा : Jitendra Awhad on CM : मासिक पाळीचे रक्त तंत्र विद्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार; जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका