नाशिक - येत्या २९ एप्रिल रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत असून या निवडणुकीत १८ लाख ५३ हजार ५११ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात ९ लाख ७४ हजार ९८८ पुरुष, ८ लाख ७८ हजार ४५० महिला, ६७ तृतीयपंथी तर ६ एन.आर.आय. मतदारांचा समावेश आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातुन यंदा प्रमुख पक्षातील एक खासदार, एक माजी खासदार, एक माजी आमदार, एक माजी नगरसेवक आपले नशीब आजमावत आहेत. यामुळे ही निवडणूक चौरंगी झाली आहे. राष्ट्रवादी महाआघाडीकडून माजी खासदार समीर भुजबळ, भाजप - शिवसेना युतीकडून खासदार हेमंत गोडसे, वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक पवन पवार तर भाजपचे बंडखोर आमदार माणिकराव कोकाटे अपक्ष उमेदवारी रिंगणात आहे.
नाशिकमध्ये उमेदवाराची पात्रता, प्रचाराचे मुद्दे, विकासाचे धोरणं यासोबतच जात आणि धर्म हा निकष देखील महत्वाचा मनाला जात आहे. हे आजवर झालेल्या निवडणुकीतुन समोर आले आहे. या लोकसभा मतदारसंघ ६ विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यात ३ जागा भाजप, २ जागा सेना तर १ जागा काँग्रेसकडे आहे.
नाशिकमध्ये काही भागातील एकगठ्ठा मतदान हे निर्णायक ठरण्याचा अंदाज आहे. यात नाशिक मध्यमधील १७ टक्के मुस्लिम मतदार, नाशिक पूर्वमधील ३५ टक्के मराठा मतदार, नाशिक पश्चिममधील २८ टक्के ओबीसी मतदार, सिन्नरमधील ३९ टक्के मतदार, वंजारी आणि इगतपुरीमधील ५४ टक्के आदिवासी समाज यांचा समावेश आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील समाजनिहाय मतदार
१) मराठा - ३ लाख ५९ हजार ८५५
२) अनुसूचित जमाती- २ लाख ५२ हजार १८६
३) वंजारी - १ लाख ९७ हजार ६६४
४) मुस्लिम - १ लाख ९६ हजार १६५
५) कुणबी - १ लाख ९० हजार ३७
६) अनुसूचित जाती - १ लाख ८३ हजार ३०५
७) माळी- १ लाख ३२ हजार ९८५
८) धनगर - ८४ हजार ४९९
९) लिंगायत ३ हजार ५९०
१०) आगरी ८ हजार ५२५
११) इतर - १ लाख ९४ हजार ९५
नाशिकमधील सांस्कृतीक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील नागरिकांनी आपले खासदार आणि येणाऱ्या सरकारकडे अपेक्षा व्यक्त केल्या..
खाजगी शिक्षण क्षेत्रातील धोरण सरकारने ठरवावे. राईट टू एज्युकेशनमधील भ्रष्टाचार थांबवावा, इनोव्हेशन आणि क्रेअटीव्हिटीला वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांना सरकारने प्रोत्साहन द्यावे, खाजगी क्षेत्रातील शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना सरकारी कामे देऊ नये, शिक्षणावर जीडीपी ३ टक्के खर्च केला जातो तो ६ टक्क्यांपर्यँत न्यावा जेणेकरून शिक्षणाची गुणवत्ता वाढेल, असे खाजगी शिक्षण संस्थेचे चालक सचिन जोशी यांनी सांगितले.
डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी. भारतीय अर्थव्यवस्थेत सरकारी रुग्णालयावर होणार खर्च १ टक्क्याहून अधिक करावा जेणे करून रुग्णानां चांगली सेवा देता येईल. नाशिकमधील हॉस्पिटल रजिस्टेशनचा प्रश्न मार्गी लावावा, वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणात फेररचना करून मेरिटमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. बोगस डॉक्टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बालरोग तज्ञ डॉ. मिलिंद भराडीया यांनी केली.
नाशिकला चित्रपट नागरी व्हावी, इगतपुरी येथील मुंडेगाव येथे तशी जागा आरक्षित असून निवडून येणाऱ्या खासदारांनी प्रयत्न करावे. मुंबई, पुणे आणि ठाण्याच्या कलाकारांना चांगलं पर्याय होईल आणि रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा नाट्य परिषदेचे प्रतिनिधी पियुष नाशिककर यांनी व्यक्त केली.