नाशिक- रेशन दुकानदारांना विमा सुरक्षा कवच देण्यात यावे, पॉस मशीन चालवताना रेशन दुकानदारांना येत असलेल्या नेटवर्कचा अडचणी त्वरित दूर कराव्यात आणि दुकानदार यांना त्यांच्या कामाच्या आधारे ठराविक मानधन देण्यात यावे, आदी मागण्यासाठी एक जूनपासून राज्यभरातील रेशन दुकानदार राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत.
रेशन दुकानदार १ जूनपासून करणार आंदोलन; केल्या 'या' विविध मागण्या - लेटेस्ट न्यूज इन नाशिक
ऑल इंडिया फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी एक जूनपासून रेशन दुकानदारांनी धान्य उचल आणि वितरण बंद करण्याचे आवाहन केले आहे. याच अनुषंगाने एक जूनपासून जिल्ह्यातील रेशन दुकानदार अनिश्चित काळासाठी रेशन दुकाने बंद ठेवणार आहेत.
रेशन दुकानदारांना विमा सुरक्षा कवच देण्यात यावे, पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे मोफत धान्य वाटपाचे कमिशन देण्यात यावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेशन दुकानदारांचा नॉमिनी म्हणून अंगठा ग्राह्य धरावा आदी मागण्यांची शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी म्हणून ऑल इंडिया फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी एक जूनपासून रेशन दुकानदारांनी धान्य उचल आणि वितरण बंद करण्याचे आवाहन केले आहे. याच अनुषंगाने एक जूनपासून जिल्ह्यातील रेशन दुकानदार अनिश्चित काळासाठी रेशन दुकाने बंद ठेवणार आहेत. याबाबत रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी अधिक माहिती दिली आहे.
रेशन दुकानदारांच्या समस्या सोडवून त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, यासाठी जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आले आहे. रेशन दुकानदारांच्या मागण्यांची शासनाने 1 जून आधी दखल न घेतल्यास जिल्हाभरातील रेशन दुकाने बंद राहणार आहेत. यामुळे आता प्रशासन याबाबत नेमका काय निर्णय घेते हे महत्त्वाचे ठरणार आहे.