नाशिक- दरवर्षी येथे होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमीचा सण राहडीत साजरा करण्यात येतो. यावर्षीही पारंपरिक पेशवेकालीन राहाडीत रंगपंचमी साजरी करत नाशिककरांनी आज हे वैशिष्ट्य जपले. या राहाडीत पाण्यासोबत नैसर्गिक रंग टाकून रंगपंचमी खेळली जाते. यात बच्चेकंपनीपासून ते ज्येष्ठ नागरिक मोठ्या उसाहाने सहभागी झालेले दिसून येतात.
नाशिकमध्ये पारंपरिक पेशवेकालीन राहाडीत रंगपंचमी उत्साहात - नागरिक
नाशिकमध्ये पारंपरिक पेशवेकालीन राहाडीत रंगपंचमी साजरी करण्यात आली.
धार्मिक आणि आध्यत्मिक ठिकाण म्हणून नाशिकची ओळख आहे. याच नाशिकमध्ये रंगपंचमी सण त्याच पद्धतीने साजरा केला जातो. नाशिकच्या जुन्या भागात नागरिकांना एकत्रित रंगपंचमीचा सण साजरा करता यावा म्हणून पेशव्यांनी राहाडीची निर्मिती केली होती. या जुन्या नाशिक भागात आधी जवळपास १३ राहाडी होत्या. कालांतराने यातील बऱ्याच राहाडी लोप पावल्या. आता फक्त ४ राहाडी जिवंत असून रंगपंचमीनिमित्त त्या उघडल्या जातात. या राहाडी १० बाय १० फुटाच्या असून १० ते १५ फूट खोल आहेत.
या राहाडीत असणारा केसरी, लाल ,गुलाबी, पिवळा रंग त्या त्या राहाडीची ओळख आहे. सकाळी ११ ला राहाडिंची विधीवत पूजा करून यात नैसर्गिक रंग टाकले जातात. त्यानंतर प्रथम मानाच्या व्यक्तींनी राहाडीत उडी मारल्यावर इतर नागरिकांसाठी ही राहाड खुली केली जाते. सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाशिककर या राहाडीत उडी मारून रंगपंचमीचा आनंद घेतात.