नाशिकPM Narendra Modi Kalaram Temple :: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून, भगवान श्रीरामाचे दर्शन घेतलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे प्रधानमंत्री मोदी यांचा भगवान श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, श्री. काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, प्रणव पुजारी, अद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिरचं का निवडलं ? : काळाराम मंदिर हे हेमाडपंथी बांधकाम असलेलं प्राचिन मंदिर आहे. प्रभू राम, लक्ष्मण आणि सीता मातेची प्राचीन मूर्ती या मंदिरात विराजमान आहे. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या या काळाराम मंदिरात देशभरातून पर्यटक दर्शनासाठी येत असतात. तसेच, दलितांना मंदिर प्रवेशासाठी स्वतः डॉं. बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाचे नेतृत्व केलं होतं. म्हणूनही यया मंदिराचे अनेक पैलू असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराची दर्शनासाठी निवड केल्याचे म्हटले जात आहे.
पूर्वी लाकडी मंदिर : मंदिराच्या ठिकाणी श्रीरामांची 'पर्णकुटी' होती. राम सव्वा दोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. ओढा नाशिकरोड येथील जहागिरी असलेले पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचं बांधकाम करण्याची आज्ञा केली होती. याच काळात ओढेकर यांना 'तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असा रामाचा स्वप्नदृष्टांत झाल्याचे बोलले जातं. काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होते. समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात रामाची उपासना केली होती. मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या रामकुंडात मिळालेल्या आहेत. या मूर्ती वालुकामय आहेत.
1778 ते 1790 या कालखंडात मंदिर पूर्ण झालं : मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘रामशेज’ नावाच्या डोंगरावरून दगड आणण्यात आलं. या डोंगरावर राम रात्री निद्रा करण्यासाठी जात, असेही बोलले जाते. या डोंगरावरील दगड काढल्यानंतर दूध आणि नवसागर टाकून उकळून त्याचे परीक्षण केले गेलं. पूर्ण बांधकाम या दगडांपासून झाले आहे. 1778 ते 1790 या कालखंडात मंदिर पूर्ण झाले आहे. त्यावेळेस या मंदिराच्या बांधकामाला 23 लाख खर्च आला होता. दरवर्षी देशभरातून हजारो पर्यटक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात.