नाशिक - शहरात चोऱ्या, घरफोड्या, खून, दरोडे यासारख्या घटनांचे सत्र रोखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी कंबर कसली आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांकडून 'नागरिक-पोलीस संवाद' कार्यक्रम घेतला जात आहे. त्याद्वारे नागरिकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितेची भावना दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नागरिकांशी संवाद साधताना नांगरे पाटील नागरिकांनी आपल्या मालमत्तेची काळजी कशी घ्यावी? तसेच आपल्या परिसराची सुरक्षा कशी करता येईल, या संदर्भात पोलीस आयुक्त नांगरे-पाटील थेट नागरिकांमध्ये जाऊन मार्गदर्शन करत आहेत. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे धडे दिले जात आहेत. तसेच चोरट्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा निर्माण करण्याबाबत शहराचा आढावा घेण्यात येत आहे.
नागरिक-पोलीस संवाद कार्यक्रमाअंतर्गत सरकारवाडा येथील चोपडा लॉन्स येथे हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी प्रभागातील नगरसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच पोलीस आयुक्तांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. त्यामाध्यमातून त्यांच्या मनात निर्माण झालेली भिती दूर करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.
महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या "वॉक विथ कमिशनर" कार्यक्रमाची आठवण -
नाशिकचे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट नागरिकांमध्ये जाऊन त्यांना येणाऱ्या अडचणी जाऊन घेतल्या होत्या. तसेच त्यांनी नागरिकांनी सांगितलेल्या अडचणी तत्काळ सोडण्यावर भर दिला होता. आता त्यांच्यासारखेच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची आठवण झाली असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या.