नाशिक - जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. याचा परिणाम अनेक उत्सवांवरदेखील होत आहे. गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे दुकानांमध्ये जाऊन मूर्ती खरेदी करणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे. बहुतांशी नागरिक हे ऑनलाइन गणेश मूर्ती बुकिंगला पसंती देत आहेत. यावर्षी पर्यावरण पूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तीला भविकांची मोठी मागणी असल्याचे मूर्ती विक्रेत्यांनी सांगितले.
कोरोनामुळे नाशिककरांची ऑनलाइन गणेशमूर्ती बुकिंगला पसंती
जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांपासून कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. येत्या 22 ऑगस्टला गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे. शहरात ठिकठिकाणी आकर्षक गणेशमूर्तीचे स्टॉल थाटण्यात आले आहेत. मात्र, कोरोनामुळे यंदाच्या वर्षी गणेशभक्त दुकानात जाऊन गणेश मूर्ती खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन गणेश मूर्ती खरेदी करण्यास पसंती देत आहेत.
लॉकडाऊनचा फटका प्रत्येकच व्यवसायाला बसला आहे. मूर्ती व्यावसायिकांचाही त्यात समावेश आहे. लॉकडाऊन काळात मूर्ती बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल, रंग, कारागीर यांची कमतरता भासल्याने तसेच डिझेलच्या किंमती वाढल्याने याचा परिणाम गणेश मूर्तीच्या किंमतीवर झाला आहे. यावर्षी 40 ते 50 टक्केच गणेशमूर्ती बाजारात येणार असल्याचे मूर्तिकार सांगतात. तसेच मागील वर्षीपेक्षा यंदा पीओपी आणि शाडूच्या गणेश मूर्तीच्या किंमतीत 15 ते 20 टक्यांनी वाढ झाली आहे.
भविकांची शाडूच्या गणेश मूर्तीला पसंती -
गेल्यावर्षी जलप्रदूषण टाळण्यासाठी नाशिककरांनी सर्वाधिक दोन लाखांहून अधिक पीओपीच्या गणेशमुर्त्या विसर्जनाच्या वेळेस महानगरपालिकेकडे दान केल्या होत्या. यावर्षी भाविक शाडूच्या आणि सीडच्या गणेश मूर्तींना पसंती देत असून या मूर्तींची किंमत 500 रुपये ते 5000 हजार रुपयांपर्यंत आहे.