नाशिक- देशात मॉब लिंचींगच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अल्पसंख्यांक समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. परिणामी राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येऊ पहात असल्याने समाजात दूही निर्माण केली जात आहे. म्हणून या घटनांना आळा बसावा, मॉब लिंचींगच्या घटनांमध्ये बळी पडलेल्या पीडितांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करावी, अशा घटनांची जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी, आरोपींना जन्मठेप अथवा फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करीत बहुजन मुस्लीम संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला होता.
नाशिकमध्ये 'मॉब लिंचींग' विरोधात मुस्लीम समुदायाचा मोर्चा - Kapil Bhaskar
देशात घडलेल्या मॉब लिंचींगच्या घटनांच्या विरोधात नाशकात मोर्चा काढण्यात आला.
शहर ए खातीब, हाजीफ इस्लाम हिसामुद्दीन खतीब यांच्या उपस्थितीत जुन्या नाशिकच्या चौक मंडळी भागातून मोर्चाला सुरुवात झाली. दुवा पठाण झाल्यानंतर निघालेल्या मोर्चात भारत जिंदाबाद, संविधान झिंदाबाद, इन्कलाब झिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा दूध बाजार, खडकाळी, जिल्हा परिषद मार्गे ईदगाह मैदानावर मोर्चाची सांगता झाली. या मोर्चात ४ ते ५ हजार नागरीकांनी सहभाग घेतला. शांततेत निघालेल्या मोर्चामधून असंतोष व्यक्त होत राहिला. मोर्चात स्वच्छता ठेवण्यासाठी कार्यकर्ते अग्रस्थानी होते.
या मोर्चात शेख असिफ शेख, किरण मोहिते, नगरसेवक मुशीर सय्यद, माजी नगरसेवक संजय साबळे, बशीर शेख सुफी जीन, डॉ. शोभा बच्छाव, शाहू खैरे, रईस शेख, सलीम शेख, वामन गायकवाड, शरद आहेर यांच्यासह मुस्लीम आणि बहुजन समाजातील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.