नाशिक - श्रावण महिना सुरू झाला आहे. महिन्याच्या पहिल्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येस त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. श्रावणाच्या पहिल्या सोमवारचा पर्वकाल साधण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतील, असा अंदाज गृहित धरून प्रशासन सज्ज झाले आहे. परंतु, दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्याने पहिल्या सोमवारी भाविकांची गर्दी दरवर्षीपेक्षा कमी असल्याचे दिसुन आले.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिराची ओळख आहे. येथे श्रावण महिन्यात भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. यामुळे भाविकांची संख्या लक्षात घेता नाशिक प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली असून संपूर्ण परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच या परिसरातील भारनियमन महिनाभरासाठी रद्द करण्यात आला आहे. आरोग्य विभागाकडून विशेष पथक या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.