नाशिक- जिल्ह्यातील मालेगाव हे सध्या कोरोनाचे हॉट-स्पॉट म्हणून ओळखले जात असताना देखील येथील नागरिकांना मात्र कोरोनाचा विसर पडल्याचा प्रकार समोर आला आहे. मालेगाव शहरातील चित्रपटगृहात प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मोहन चित्रपटगृहाबाहेरच्या गर्दीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारच्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास बाधा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
संपूर्ण राज्यात कोरोना महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होतांना दिसून येत आहे. या अनुषंगाने राज्यासह नाशिक जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत, असे असताना देखील मालेगाव शहरात मात्र कोरोना निर्बंध पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. याचाच प्रत्यय शुक्रवार (दि.१९) आला. शहरातील मोहन सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या मुंबई सागा हा चित्रपट बघण्यास प्रेक्षकांनी गर्दी केली होती, यावेळी कोरोनाच्या कोणत्याचा नियमांचे पालन या प्रेक्षकांकडून करण्यात येत नव्हते आणि चित्रपट गृह व्यवस्थापकांनीही कोरोना नियमावलीच्या पालनाकडे दुर्लक्ष्य केल्याचा प्रकार या ठिकाणी आढळून आला.