नाशिक- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांनी रुग्णालयाबाहेर ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्राने रुग्णालयाच्या पोर्चमध्ये ओपीडी सुरू केली आहे. येथे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून रुग्णांची तपासणी केली जात आहे. तपासणीदरम्यान व्यवस्थित वेंटिलेशन मिळावे यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.
दिंडोरी तालुक्यात १० प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यात पांडाणे आरोग्य केंद्र हे सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेले आरोग्य केंद्र आहे. काल (मंगळवारी) कोरोनाबाबत आरोग्य केंद्राने घेतलेल्या खबरदारींबाबत जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने आरोग्य केंद्राला भेट दिली होती. यावेळी आरोग्य केंद्रातील स्वागत कक्षाबाहेर पोर्चमध्ये डॉ. वाघ व डॉ. लक्ष्मण साबळे हे रुग्णांना सेवा देत होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण साबळे यांनी सांगितले की, १० प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वात जास्त लोकसंख्या, म्हणजे ५५ हजार लोकसंख्या असलेले पंडाणा आरोग्य केंद्र हे दोन राज्याना जोडणारा वणी-सापुतारा-सुरत या राष्ट्रीय मार्गावर आहे. त्यामुळे, आरोग्य केंद्रात कोणते रुग्ण कधी येतील हे सांगता येत नाही. तसचे, रुग्ण व डॉक्टरांना व्यवस्थित वेंटिलेशन मिळावे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी आम्ही ओपीडी बाहेर घेतल्याचे सांगितले. यावेळी रुग्णांच्या तपासणीदरम्यान आवश्यक त्या सर्वबाबींचे पालन होत असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले.