नाशिक - गंगापूर धरण 80 टक्के भरल्याने गंगापूर धरणातून गोदावरी नदीत पाच हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या परिस्थितीत गोदावरी नदीला पूर आल्याने काही अतिउत्साही नाशिककर नदीच्या पाण्यात उतरत धोकादायक फोटोसेशन करत आहे. चित्र गोदाघाट परिसरात हे चित्र पाहायला मिळाले.
गंगापूर धरणातून गोदावरीत पाण्याचा विसर्ग -
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख गंगापूर धरणातील पाणीसाठा हा 80 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. परिणामी गुरुवारपासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गुरुवारी सकाळी पाचशे क्यूसेकने केला जाणारा हा विसर्ग शुक्रवारी सकाळपर्यंत पाच हजार क्युसेकपर्यंत जाऊन पोहोचला आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कोरडीठाक पडलेली गोदावरी नदी पुन्हा एकदा दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र सध्या गोदाघाट परिसरामध्ये पाहायला मिळत आहे.
गोदावरी नदीला हंगामातील पहिला पूर आला असून शहरातील ऐतिहासिक पर्जन्यमापक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे. मात्र, नदीला पूर येताच काही अतिउत्साही नाशिककरांकडून आपले जीव धोक्यात घालून त्याठिकाणी फोटोसेशन करण्यात येत असल्याचे चित्र बघायला मिळाले. आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन थेट पाण्यामध्ये उतरत काही जणांकडून फोटोसेशन करण्यात येत आहे.
पर्यटकांवर महापालिका आणि पोलीस प्रशासन हे दंडात्मक कारवाई करणार -
गोदावरी नदीच्या पाणी पातळीत प्रशासनाकडून नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नाशिक शहरावर ओढावलेले पाणीकपातीचे संकट लवकरच दूर होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे नंदीला हंगामातील पहिला पूर आल्याने अतिउत्साही लोकांकडून पाण्यात उतरून फोटो काढले जात आहेत. अशा पर्यटकांवर महापालिका आणि पोलीस प्रशासन दंडात्मक कारवाई करणार आहेत. यामुळे असे जीवघेणे प्रकार कोणीही करू नये, असे आवाहन पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.